बारामती (प्रतिनिधी):
बारामती कसबा येथील श्रीराम नगर परिसरात बारामती नगरपालिकेच्या कचरा संकलन गाड्यांमधून मिळणारे भंगार साहित्य थेट खासगी भंगार दुकानावर विक्री करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
कचरा गाड्यांमधून जमा होणारे लोखंड, प्लास्टिक, टिन, वायर व इतर भंगार साहित्य अधिकृत नियमांनुसार नगरपालिकेच्या ताब्यात जाणे अपेक्षित असताना ते खासगी भंगार दुकानावर पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहारात नगरपालिकेचे कर्मचारी थेट सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारात कोणतीही अधिकृत नोंद, वजन काट्याची पावती, लिलाव प्रक्रिया किंवा लेखा परीक्षण नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचा सरळसरळ गैरवापर होत आहे. परिणामी नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असून शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार एक-दोन वेळचा नसून नियमितपणे सुरू असल्याचे चित्र असून, संबंधित भंगार दुकानावर पालिकेच्या कचरा गाड्यांची ये-जा सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की संगनमत, असा सवाल उपस्थित होत आहे.
या गंभीर गैरप्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांसह संबंधित भंगार दुकानदारावर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शहरातून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बारामती नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




