बारामती शहरातील साठेनगर परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत विकासापासून वंचित राहिला आहे. शहरातील इतर भागांमध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था यांसारखी कामे होत असताना साठेनगर मात्र कायम दुर्लक्षित का राहतो, असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
साठेनगर परिसरात आजही रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचणे, गटारांची अपुरी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची अनियमितता आणि अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था ही रोजची समस्या आहे. नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत.स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, साठेनगर परिसराकडे राजकीय सोयीस्करतेने पाहिले जाते, निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची खैरात होते, मात्र निवडणुका संपल्यानंतर हा परिसर पुन्हा विसरला जातो. ही परिस्थिती लोकशाही मूल्यांना धरून आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
जर विकास निधी उपलब्ध आहे, योजना आहेत, तर साठेनगरपर्यंत त्या का पोहोचत नाहीत? यामागे प्रशासनाची उदासीनता आहे की जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष? नगरपरिषद आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी यावर खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
साठेनगरच्या नागरिकांना भीक नको, हक्काचा विकास हवा आहे. जर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




