
माहिती अधिकार अधिनियम 2005 चा सखोल अभ्यास; राज्यभरातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
संपादक / शशिकांत खरात
सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्यावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आज पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने आयोजित या ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतून आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.या प्रशिक्षणात माहिती अधिकार क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक अब्राहम आढाव यांनी उपस्थितांना माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील विविध कलमे, अर्ज करण्याची पद्धत, माहिती मिळविण्याची प्रक्रिया, प्रथम व द्वितीय अपील, माहिती आयोगातील सुनावणी तसेच माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून प्रशासनाला उत्तरदायी कसे बनवता येते याबाबत सखोल मार्गदर्शन केले.प्रशिक्षणादरम्यान माहिती अधिकार हा केवळ कागदावरील कायदा नसून लोकशाही मजबूत करणारे आणि नागरिकांना सक्षम बनवणारे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विविध प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचार, अनियमितता आणि गैरव्यवहार कसे उघडकीस आणता येतात, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहभागी नागरिकांनी विविध शंका उपस्थित करत माहिती अधिकाराच्या व्यावहारिक वापराबाबत माहिती घेतली. प्रशिक्षणामुळे नवोदित कार्यकर्त्यांना कायद्याची सखोल माहिती मिळाली असून पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राने अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम राबवून राज्यात जागरूक नागरिकांची फळी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू ठेवले असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








