बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरात आज राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर नगराध्यक्ष सचिन सातव हे कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली. ही शाईफेक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला नाही, या आरोपावरून नाराजी व्यक्त करत सदर कार्यकर्त्यांनी हा निषेध केला असल्याची माहिती समोर येत आहे. शाईफेकीनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नगराध्यक्ष सचिन सातव यांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी हा प्रकार गंभीर मानला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या शाईफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बारामतीच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नगराध्यक्ष समर्थकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे बारामतीतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








