
बारामती शहर व तालुका हद्दीत बेकायदा गुटख्याचा पुरवठा आणि विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. गुटख्यामुळे वाढणारी अस्वच्छता, तोंडाचा कॅन्सर व इतर गंभीर आजार लक्षात घेता हा प्रकार केवळ कायद्याचा नाही तर थेट जनआरोग्याचा प्रश्न बनला आहे.
विश्वसनीय माहितीनुसार बारामती शहर व तालुक्यात गुटखा पुरवठा करणारी एक संघटित टोळी सक्रिय असून गांधी, मदने, जोंगदंड, कोठारी, लुनिया, चव्हाण, साबळे आदी नावांचा या नेटवर्कमध्ये उल्लेख केला जात आहे. यापैकी काही व्यक्तींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कारवाई अपुरी ठरत असल्याने गुटख्याचा व्यवसाय निर्धास्तपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कसबा, पेन्सिल चौक यांसारख्या संवेदनशील भागांत वेळोवेळी छापे टाकून होलसेल विक्रेत्यांकडून लाखो रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्याची मागणी जोर धरत आहे. कारण आज बारामती शहर व तालुक्यात जवळपास प्रत्येक टपरीवर गुटखा सहज उपलब्ध आहे. त्यामुळे “हा गुटखा नेमका येतो तरी कुठून?” असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जादूने तो येत नसेल, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पुरवठ्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, हाच खरा संशयाचा मुद्दा आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुटखा माफिया पोलिसांच्या आशीर्वादाने कार्यरत असल्याचे आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. जर प्रशासन खरोखरच गंभीर असेल, तर केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे तर मूळ पुरवठादार, होलसेल गोडाऊन आणि वाहतूक साखळीवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बारामती शहर व तालुका हद्दीत गुटखामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी FDA आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी, सातत्याने छापे टाकावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा वाढता गुटख्याचा प्रार्दुभाव थांबणार नाही आणि त्याची किंमत बारामतीशहर व तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या रुपाने मोजावी लागणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




