
बातमी (सविस्तर वृत्त):
बारामती (प्रतिनिधी) :
कैकाडी समाज व तांबोळी (मुस्लिम) तसेच मेहतर वाल्मिकी समाजासाठी प्रशस्त, नियोजित व नियमित समाज मंदिर उभारण्यात यावे या न्याय्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वस्ताद पप्पू माने व फिरोज मुन्ना तांबोळी तसेच मुकेश वाघेला हे गेल्या ११ दिवसांपासून बारामती नगर परिषदेच्या समोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
तिन्ही समाज घटकांसाठी स्वतंत्र व सुसज्ज समाज मंदिर उभारणे ही अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असून, नगर परिषदेने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी हे उपोषण सुरू असल्याचे वस्ताद पप्पू माने यांनी सांगितले.
फिरोज मुन्ना तांबोळी यांनी यावेळी बोलताना नमूद केले की, “आमची मागणी कोणत्याही समाजाविरोधात नाही, तर सर्वसमावेशक सामाजिक न्यायासाठी आहे. नगर परिषदेने याकडे गांभीर्याने पाहावे.”
उपोषणस्थळी दररोज विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व समाजबांधव भेट देऊन पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र, अद्याप नगर परिषद प्रशासनाकडून ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता या आंदोलनाकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे.
नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि या आंदोलनावर तोडगा कसा निघतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




