बारामती / संपादक शशिकांत खरात
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत खळबळ
कचरा संकलन डेपो शेजारील नगरपंचायतीच्या जागेत अवैध खान? कारवाई कोण करणार?
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत हद्दीत कचरा संकलन डेपो लगत असलेल्या जागेवर मोठी खान (खोदकाम) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित जमीन ही नगरपंचायतीच्या नावावर असल्याचे सांगितले जात असताना, त्या ठिकाणी नेमके कोणाच्या परवानगीने खोदकाम करण्यात आले याबाबत अधिकाऱ्यांकडे स्पष्ट माहिती नसल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांच्या मते, सदर जागेत मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन करून खान तयार करण्यात आली आहे. मात्र, ही जमीन नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, कोणत्या विभागाने परवानगी दिली, रॉयल्टी भरली आहे का, पर्यावरणीय परवानगी घेतली आहे का, याबाबत प्रशासनाकडे ठोस नोंदी नसल्याची चर्चा आहे.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार?
नगरपंचायतीच्या मालकीची जमीन असताना त्या ठिकाणी अशा प्रकारे खोदकाम होत असताना संबंधित अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले?
जागेची पाहणी, पंचनामा, उत्खनन थांबविण्याची कारवाई किंवा जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
कारवाई कोण करणार?नगरपंचायत प्रशासन,तहसील कार्यालय,महसूल विभाग,खनिज विभाग या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची आणि कारवाई कोण करणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी समिती नेमावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.अधिकाऱ्यांविरोधात रोष
सदर प्रकरणात निष्काळजीपणा, दुर्लक्ष किंवा संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.आता प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करते का, आणि नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




