बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाई जाणवू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील निबोडी येथे शेतकऱ्यांना मोफत सुधारित चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत बारामती तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना, निबोडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी आगवणे, सरपंच संतोष सोनवणे, माजी उपसरपंच भालेराव जाचक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पशुधनाला गुणवत्तापूर्ण व पौष्टिक आहार मिळावा, तसेच पशुपालक शेतकऱ्यांना चाऱ्याची उपलब्धता सुलभ व्हावी, या उद्देशाने सुधारित चारा बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राम गोटमाळे यांनी चारा बियाण्यांची लागवड, चारा उत्पादनाचे नियोजन आणि मुरघास निर्मिती याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळणार असून, पशुधनासाठी वर्षभर पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणारा उपक्रम ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




