
संपादक / शशिकांत खरात
पुणे जिल्ह्यात मोबाईलच्या माध्यमातून चालणाऱ्या कथित “Fun Target” या ऑनलाइन जुगाराच्या रॅकेटमुळे अनेक तरुण आर्थिक संकटात सापडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोरगाव येथील अशपाक नावाच्या तरुणासह काही जणांकडून हे संपूर्ण जाळे ऑपरेट केले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, या प्रकारामुळे अनेक युवक कर्जबाजारी झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलवरून सहजपणे खेळता येणाऱ्या या कथित जुगारामध्ये तरुणांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवून आकर्षित केले जाते. सुरुवातीला छोट्या रकमांमध्ये जिंकण्याचा अनुभव देत नंतर मोठ्या रकमा गुंतविण्यास भाग पाडले जाते. यात अनेक तरुणांनी हजारो ते लाखो रुपये गमावल्याची चर्चा असून काही कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.या कथित टोळीच्या व्यवहारासाठी विविध बँकांमध्ये अनेक खाती वापरली जात असल्याचा आरोप होत आहे. “मोरया ऑटो गॅरेज” तसेच इतर नावांनी खाती उघडून त्यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल केली जात असल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती कशी नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, मोबाईलवर खुलेआम सुरू असलेल्या या कथित ऑनलाइन जुगार व्यवसायामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून काहींच्या संसारावरही परिणाम होत असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. त्यामुळे संबंधित टोळीची आर्थिक चौकशी करून संपूर्ण नेटवर्क उघड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसंदर्भातील कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोबाईलवर सुरू असलेला हा कथित “Fun Target” जुगार नेमका कधी बंद होणार आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




